Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर



 महाराष्ट्राची भूमी ही पुण्यभूमी आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही. शेकडो वर्षे परकियांच्या अमलाखाली ही भारतभूमी चिरडून जात असता हीन दीन झालेल्या हिंदूच्या मनात आपल्या वैदिक धर्माबद्दल प्रेम, आदर आणि निष्ठा जागृत ठेवण्याचे काम संतांनी अव्याहतपणे केलेले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी बालपण अत्यंत हाल अपेष्टांत कंठित असताना संस्कृतमध्ये असलेला भवद्गीतेतील अमुल्य ठेवा प्राकृत भाषेत आणून कोटय़ावद्यी हिंदुंच्या मनात स्वधर्माविषयी श्रद्धा आणि निष्ठा जागृत ठेवण्याचा नंदादीप प्रज्वलीत केला.तीच परंपरा पुढे चालवून संतांनी आपल्या निस्सीम भक्तिद्वारे आणि अद्वितीय अभंगामृतांनी भक्तीचा नंदादीप तेवत ठेवला. सामान्य जनांच्या मनात अशा प्रकारे परमेश्वराबद्दल इतकी प्रीती आणि श्रद्धा निर्माण झाली की पंढरपूरला जाणाऱया वारकाऱयांच्या मुखातून होणारा गजर ज्ञानोबा माऊली नंतर झालेल्या अनेक थोर संतांची नावे घेता येणे शक्य नाही हे जाणून एकदम तुकाराम महाराजांच्यावर येऊन विसावतो. ज्ञानोबा माऊली-तुकाराम ह्या दोन अश्लारी मंत्रात अशी काही जादू भरली आहे की वारकरी शेकडो कोस अंतर तहान
भूक पाऊस पाणी आणि होणाऱया हाल अपेष्टा विसरून मार्ग सहज पार करीत पंढरपूरला येऊन पोचतात.म्हणूनच संतांनी उत्कृष्ठ मशागत केलेल्या अशा भूमीत छत्रपती शिवाती महाराज, देवी अहिल्याबाई होळकर ह्या सारख्या युग पुरूषांत गणना होणाऱया व्यक्ती जन्म घेतात. आज विसावे शतक संपत असताना सुद्धा हिंदुस्थानातील बहुसंख्य स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दारूण आणि दयनीय आहे. ह्यावरून देवी अहिल्याबाईचा जन्म झाला त्यावेळी स्त्रियांची स्थिती काय असेल ह्याची कल्पना करता येईल. अशा दुर्धर परिस्थितीत जन्माला येऊन सुद्धा, आपल्यावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरांना, परिस्थितीजन्य
अडचणींना, कारस्थानी राजकारण्यांना तोंड देत त्यांनी जे कार्य केले त्यावरून त्यांचे कर्तृत्व छत्रपती शिवाती महाराजांच्या तोडीचे असल्याचे जाणवते. आपपरभाव न ठेवता आसेतु हिमालय त्यांनी जे भव्य कार्य केले ते पाहता सरकार दरबारी त्यांची होणारी उपेक्षा पाहून मन विषण्ण होते. चौंडी येथील माणकोती शिंदे यांची कन्या अहिल्या ह्या चतुर आणि बुद्धिमान मुलीचा मल्हाररावांचे एकुलते एक पुत्र खंडेराव यांच्याशी इ.स. 1733 मध्ये विवाह झाला. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे हा बालविवाह होता. या नात सुनेवर
मल्हारराव होळकर व त्यांच्या पत्नी, खंडेरावांच्या आई, सौ. गौतमबाईसाहेब होळकर ह्यांनी संस्कार केले असे म्हणण्यापेक्षा, खंडेरावाची सुमार बुद्धिमत्ता, पराक्रमाचा अभाव, भविष्याचा वेध घेण्याची नसलेली जाण, प्रजेच्या प्रति असलेल्या कर्तव्याच्या माहितीचा अभाव, मराठी
साम्राज्याची आपल्यावर पडलेली सीमित जबाबदारी पेलण्याची शून्य क्षमता, हे ओळखून नियतीनेच सासू-सासऱयांच्याकडून सुनेवर संस्कार करून घेतले असे म्हणणे योग्य होईल.
अत्यंत कुशाग्र बुद्धी, दुसऱयांची सुख दु:खे जाणून घेणारे कोमल हृद्य, दुसऱयाच्या मनातले भाव ओळखण्याची अतिंद्रिय शक्ती, माणसांची अचूक पारख, भविष्यात आपल्यावर पडणारी जबाबदारी पेलण्याची क्षमता, युद्धशास्त्राचे ज्ञान, महसूल, अर्थशास्त्राची जाणीव, इत्यादी तिच्या अंगभूत गुणांना मल्हाररावांनी आणि सौ. गौतमबाईसाहेबांनी सातत्याने उजाळा देण्याचे प्रयत्न केले. तिच्यावर अनेक जबाबदाऱया सोपवून आपल्या मार्गदर्शनाखाली
त्या पूर्ण करून घेतल्या ह्यातूनच मल्हारराव होळकरांच्या पश्चात् अहिल्याबाईचे लोकोत्तर गुण दिसून येऊ लागले, आणि हिंदुस्थानात एक अत्यंत कर्तबगार, प्रजाहित दक्ष, श्रेष्ठ राजकारणी, थोर मुत्सद्दी, उत्कृष्ट प्रशासक अशा अहिल्याबाईचा उदय झाला . 20 मे 1766 रोती आलमपूर येथे सुभेदार मल्हारराव होळकरांचा एकाएकी मृत्यू झाल्यापासून तो 13 ऑगस्ट 1794 रोती देह ठेवण्यापर्यंतचा काळ हा अहिल्या युग मानण्यात दुमत होईल असे
वाटत नाही. तागायत अहिल्याबाईंची उंची गाठणारी स्त्री हिंदुस्थानात जन्माला आलेली दिसत नाही, आणि जगात कुठे आली असेल किंवा नाही ह्याची शंकाच आहे. ह्या संबंधी सर लोपर लोथब्रीज म्हणतात की अशा अत्यंत कर्तृत्ववान स्त्रीला हिंदुस्थानच्या इतिहासात दुर्लक्षित स्थान आहे.
सौभाग्यवती अहिल्याबाईना त्या वीस वर्षाच्या असताना देपाळपूरला सन 1745 साली पुत्र रत्नाचा लाभ झाला. ह्याचे नाव मालीराव. मुलगा नाही तर नातू तरी महापराक्रमी होईल अशा आशेने नातवाला गोडकौतुकात अंगाखांद्यावर खेळवत मल्हारराव होळकर आणि गौतमाबाईसाहेब गुंगून गेल्या होत्या. तो अहिल्याबाईना सन 1748 साली कन्या रत्नाचा लाभ झाला. मल्हाररावांच्या वाडय़ात आनंद ओसंडून वाहू लागला. गौतमबाईसाहेबांचे डोळे नातवंडे मोठी कधी होतात याकडे लागले होते. पण देवाच्या मनात काही वेगळेच होत असे म्हणावे लागते.मृत्यू ही कल्पनाच किती दाहक आणि आपले आयुष्य, संसार उध्वस्त करणारी आहे
याचा अत्यंत कठोर अनुभव अहिल्याबाईना लहानपणीच आला. त्या 29 वर्षाच्या असतानाच कुंभेरीच्या वेढयात त्यांचे पती खंडेराव तोफेचा गोळा लागून ठार झाले. अहिल्याबाईच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. होळकरांच्या वाडय़ात मृत्यूने प्रवेश केला होता. त्यावेळच्या प्रथेनुसार अहिल्याबाई आणि त्यांच्या तेरा सवतींनी सती जाण्याची तयारी केली. ह्या वेळी त्यांचा पुत्र मालेराव 6 वर्षाचा तर कन्या मुक्ताबाई 3 वर्षाची होती. अहिल्या सती जात आहे हे कळल्यावर पुत्र वियोगाच्या दु:खापेक्षा मल्हाररावांना जास्त
धक्का बसला. ते पुरे खचले. मोठय़ा मिनतवारीने त्यांनी अहिल्येला सती जाण्यापासून थांबवले. तेव्हा त्यांनी केलेला शोक अहिल्येस सहन होईना. तू माझे पाठीवर आहेस तर अहिल्या मेली व खंडू आहे हा मला भरवसा. असा अनेक प्रकारे मल्हाररावांनी केलेला आक्रोश बघून तिचे हृद्य गलबलून गेले आणि ती सती गेली नाही. सतीची ल्यायलेली वस्त्र त्यांनी उतरवून ठेवली.
अहिल्याबाईच्या समोर त्यांच्या तेरा सवती खंडेरावांच्या चित्तेत प्रवेश करून जळून गेल्या. खंडेरावांच्या कुत्रीला पण त्या चित्तेत जाळून टाकण्यात आले. चित्ता धडाडून पेटल्यावर तेरा सवतींनी फोडलेल्या किंकाळयांनी अहिल्याबाईचे हृद्य शतश: विदीर्ण झाले. ह्या दु:खातून अहिल्याबाई सावरल्या आणि पूर्वीप्रमाणेच व्यवहारात लक्ष घालू लागल्या. खंडेरावांच्या निधनानंतर त्यांच्यावरील जबाबदाऱयांतही वाढ झाली.
1756 साली वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी मालीरावांचा पहिला विवाह केला. लवकरच त्याचे दुसरे लग्न पण करून टाकले. मैनाबाई आणि पिरताबाई ह्या दोन सुना वाडय़ात नांदायला आल्या.
अहिल्याबाईच्या सासूबाई गौतमाबाईसाहेब महा करारी, शिस्तीच्या भोक्त्या, अत्यंत धार्मिक, तेजस्वी आणि बुद्धिवान होत्या. अहिल्याबाईना घडविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. सुभेदार मल्हारराव होळकर सतत स्वाऱयावर असल्या कारणाने अहिल्याबाई गौतमाबाईसाहेबांच्या मदतीने दौलतीचा कारभार बघत असत. स्वाऱयांवर असले तरी मल्हाररावांचे दौलतीत बारीक लक्ष असे. अनेक वेळा ते अहिल्याबाईना पत्रांनी सूचना देत. काही वेळा कडक पत्र लिहून त्यांना सूचनांचे तंतोतंत पालन करायला सांगत. अशावेळा त्यांना सासूबाईचा आधार वाटे. तो आधार पण एकाएकी तुटला. 29 सप्टेंबर 1761 रोती वयाच्या 66 व्या वर्षी गौतमबाईसाहेब पण हे जग सोडून गेल्या.
दौलतीचा सर्व कारभार अहिल्याबाई समर्थपणे पाहू लागल्या. अशा रीतीनी खडतर आयुष्य कंठीत असताना 20 मे 1766 रोती आलमपूरला असताना कानाला ठणका लागल्याचे निमित्त होऊन सुभेदार मल्हारराव होळकर हे जग सोडून गेले! त्यांच्या बरोबर त्यांच्या दुसऱया दोन बायका, अहिल्याबाईच्या सावत्र सासवा सौभाग्यवती द्वारकाबाईसाहेब आणि सौभग्यवती बनाबाईसाहेब सती गेल्या.आता अहिल्याबाईचे सर्व आधार तुटले. फक्त एकच आधार उरला तो खांडाराणी हरकुंवरबाईचा.
अहिल्याबाईनी आपला पुत्र मालीराव ह्याच्या नावाने पेशव्यांकडून सुभेदाराची वस्त्र आणवली आणि काही महिन्यांनी कन्या मुक्ता हिचा विवाह यशवतंराव फणसे यांच्याबरोबर लावला. यशवंतराव फणसेंना आधीच्या दोन बायका होत्या. येवढी उस्तवार होते तो त्यांच्यावर आभाळाची कुऱहाड कोसळली. त्यांचा एकुलता एक पुत्र मालीराव 27 मार्च 1767 रोती वयाच्या 22 व्या वर्षी वेडय़ाचे तीव्र झटक येऊन वारला. त्याच्या बरोबर त्याच्या दोन्ही सुना सौभाग्यवती मैनाबाई आणि सौभाग्यवती पीरताबाई सती गेल्या. वंशाचा एकच दिवा होता तो पण देवाने विझवून टाकला. अशा रीतीने सगळीकडून मृत्यूचे घाले होळकरांच्या वाडय़ावर पडत असता कन्या सौभाग्यवती मुक्ताबाईस मुलगा झाला.
त्याचे नाव धोंडिबा उर्फ नथ्याबा असे ठेवले. पोटीचा पुत्र गेला. आता जावयाच्या पुत्राला शिकवून सवरून मोठा करू. तो दौलत सांभाळेल ह्या आशेने त्या परत कामाला लागल्या. ह्या सर्व दु:खाच्या तडाख्यात त्यांना धीर आणि आधार द्यायला श्रीमंत माधवराव पेशवे होते. संकट समयी पेशव्यांचा आणि सौभाग्यवती रमाबाई साहेबांचा त्यांना मोठा आधार होता. परंतु हे पण दैवाला पाहवलं नाही. 18 नोव्हेंबर 1772 रोती थेऊर मुक्कामी श्रीमंत माधवराव अल्पवयातच गेले, आणि साध्वी रमाबाईसाहेब सती गेल्या!
मोठय़ा हौसेने त्यांनी नथ्याबाची दोन लग्ने करून दिली. दोन सुना सौभाग्यवती बाळाबाई व सौभाग्यवती र्गारीबाई कन्या मुक्ताबाईकडे नांदायला आल्या. लग्नसमयी नथ्याबा फक्त तेरा वर्षाचा होता. हे पण सुख त्यांच्या नशिबी नव्हते. 15 नोव्हेंबर 1787 रोती नथ्याबा क्षयरोग होऊन जग सोडून गेला. त्याच्या बरोबर त्याच्या दोन्ही बायका बाळाबाई आणि गौरीबाई सती गेल्या. अहिल्याबाई नथ्याबाच्या मृत्यूने पुऱया खचला. मुलाकडून आणि
मुलीकडून त्यांच्या रक्ताची पुढील पिढी संपून गेली. एकटय़ा सौभाग्यवती मुक्ताबाईचा आधार आता राहिला होता. पण दैवाला हे पण मंजूर नव्हते. त्यांचा जणू निर्वेश करायला मृत्यू टपून बसला होता. त्यांनी पण शेवटी डाव साधला आणि 3 नोव्हेंबर 1791 रोती जावई यशवंतराव रक्ताची उलटी होऊन एकाएकी गेले ! त्यांच्याबरोबर सौभाग्यवती मुक्ताबाई आई अहिल्याबाईच्या मनधरणीला, विनवण्यांना न मानत मोठय़ा धैर्याने सती गेली. तिच्याबरोबर तिच्या दोन सवतीही सती गेल्या. अहिल्याबाई ह्या जगात आता अगदी एकटय़ा उरल्या. 19 मार्च 1754 ला पती खंडेराव मृत्यू झाले. माहेरचे आणि होळकरांचे भाऊनंद ह्यांच्यावर मृत्यूचे घाले पडले ते वेगळेच!
कल्पनासुद्धा करता येत नाही असे मृत्यूचे तांडव चालत असता अनेक संकटांशी धैर्यानी तोंड देऊन त्यांनी जे कार्य केले ते अद्वितीय असेच आहे. मालेरावाच्या अकाली मृत्यूनंतर अहिल्याबाईच्यावर पहिला घाला पडला. तो कोणा शत्रूकडून नाही तर राघोबादादांच्याकडून. मालेराव गेल्यावर गंगोबा तात्यांच्या कारस्थानाला बळी पडून होळकरांची दौलत जप्त करायला राघोबादादा पन्नास हजार फौजेनिशी निघाले. राघोबादादा दौलतीवर चालून येत असल्याचा सुगावा लागल्याबरोबर, युद्धशास्त्रात निपुण, सुभेदार मल्हाररावांच्या बरोबर प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या अहिल्याबाईनी सरदार तुकोतीराव होळकर, गायकवाड, शिंदे, आदी मातबरांना तातडीने फौजासह येऊन मदत करण्यासाठी खलिते पाठविले. पुण्याला श्रीमंत माधवराव पेशव्यांच्याकडे पत्र घेऊन दादासाहेबांचा इरादा त्यांच्याकडे कळवला आणि त्यांना हस्तक्षेप करण्यास विनंती केली. त्याचबरोबर आपले आप्त सरदार तुकोतीरावांना सुभेदारीची वस्त्र मिळावीत म्हणून विनंती करून नजर पाठविली.इकडे इंदूरला सर्व सरदार खलिते मिळताच फौजेसह धावून आले. सव्वा लाख फौजतयार झाली.
पेशव्यांचा खलिता आला की दौलतीवर वाईट नजर ठेऊन कोणी आल्यास बेलाशक पारिपत्य करावे. तोपर्यंत दादासाहेब येऊन पोचले आणि त्यांनी नर्मदा तीरावर डेरे टाकले. त्यांनी अहिल्याबाईला दौलत स्वाधीन करण्यास निरोप पाठविला. तो निरोप मिळताच अहिल्याबाईनी जबाब दिला की मजजवळ लाख सव्वा लाख फौज तयार आहे. नर्मदा ओलांडल्यास तुमची आमची तलवार चालेल. नर्मदेत बुडवून टाकू. हा जबाब मिळताच आणि अहिल्याबाईची युद्धाची तयारी बघताच दादासाहेब घाबरले आणि निरोप पाठविला की चिरंतीव मालीरावांचा काळ झाला म्हणून सांत्वनार्थ आलो आहोत. त्यांनी फौज परत पाठवून दिली आणि ते सडे आले. एक महिना राहिले अन् परत गेले. इतक्यात पुण्याहून तुकोतीरावांच्या नावे सुभेदारीची वस्त्र आली. मालीराव गेल्यापासून केवळ 75 दिवसात हा प्रकार झाला. त्यावेळी दौलतीच्या गादीवर स्त्रियांनी बसणे शास्त्र संमत नव्हते. अन्यथा त्यांनी स्वत:च सुभेदारीची वस्त्र धारण केली असती.
राघोबादादा महेश्वरला एक महिना राहिले होते तेव्हा त्यांनी अहिल्याबाईच्याकडे दानधर्म करण्यासाठी काही लाख रुपये आणि कापड मागितले होते. त्यांच्या मागणीला नकार देताना त्या म्हणाल्या होत्या की माझी खाजगी दौलत 16 कोटी रुपये आहे. पण त्यावर मी तुळशीपत्र ठेवले आहे. हे द्रव्य धर्मकार्यार्थ खर्च व्हायचे आहे. आता मी विधवा. माझ्याकडे तुम्हाला द्यायला द्रव्य नाही.
खाजगी संपत्ती ती सुद्धा सोळा कोटी रुपये धर्मार्थ खर्च करण्याचे ठरवल्यावर प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यापूर्वी केवळ आपल्या दौलतीतील प्रजाजनांचाच विचार न करता त्यांनी आसेतुहिमाचल पसरलेल्या हिंदुस्थानातील आपल्या सर्वच प्रजाननांचा विचार केला.
अत्यंत धार्मिक आणि सत्वशील असलेल्या अहिल्याबाईनी देशभर तीर्थयात्रा करत असलेल्या भक्तजनांचे होणारे हाल कमी करण्यासाठी तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधण्याची योजना आखली. त्याच वेळी नर्मदाकाठी राहणाऱया प्रजेचे घाटाअभावी होणारे हाल त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. म्हणून सर्व देशभर नद्यांना घाट बांधण्याचे योजले. जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे तिथे ए`सपैस विहीरी बांधायच्या, ठिकठिकाणच्या मंदिरांचा जिर्णोद्वार करायचा,
शुभकार्यासाठी द्रव्याची अडचण भासणाऱया विविध मंदिरांना दान धर्म करण्याचे त्यांनी योजले. अनेक मंदिरांना देण्ग्या, जमिनी देऊन पूजेचे प्रबंध केले. काही मंदिरांना प्रतिवर्षी ठराविक रक्कम पाठविण्याचे ठरविले. दरवर्षी अनेक तीर्थक्षेत्री गंगाजळ कावडी पाठविण्याचे योजले. ह्या कामी सुभेदार मल्हारराव यांच्या खांडराणी हरकुंवरबाई आणि त्यांचे पुत्र भारमलदादा यांचे अहिल्याबाईना मोलाचे साहाय्य झाले. ह्या सर्व कामांची आखणी करायची, आराखडे बनवायचे, साहित्याचा पुरवठा, वेळोवेळी लागणाऱया द्रव्याची व्यवस्था करणे यात त्यांचा कस लागला. दळणवळणाची अत्यंत अपुरी साधने, इंदुरला राहून सर्व देशभर चाललेल्या कामावर देखरेख ठेवणे, ती कामे उत्तम रीत्या पार पडत आहेत की नाही ह्याकडे बारीक लक्ष ठेवणे, वेळेवर हुकूम आणि ठरल्याप्रमाणे कामे होत आहेत की नाही हे तपासणे आदी अनेक कामे अत्यंत कुशलतेने त्यांनी पार पाडली. यात त्यांचे असामान्य प्रशासकीय कौशल्य दिसून येते.
चिरंतीव मालेरावांच्या मृत्यूनंतर 13 ऑगस्ट 1795 ला देह ठेवीपर्यत म्हणजे अवघ्या 27 वर्षात त्यांनी पार पाडलेल्या कार्याकडे बघता आपला विश्वास बसत नाही. त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घ्यायचा येथे प्रयत्न केला आहे. संबंध देशभर पसरलेल्या सतरा मंदिरांना घसघशीत दान धर्म केला.
काशीविश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, घृणेश्वर मंदिर आदि पाच मंदिरांचा पूर्णपणे तीर्णोद्वार केला. द्वारका, मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर आदी मंदिरात (एकुण आठ) दररोजचा पूजा प्रबंध केला. तो अगदी आज तागायत चालू आहे. बद्रिनारायण ते रामेश्वर आदी अकरा तीर्थक्षेत्री प्रचंड धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईनी काश्मीरमध्ये बांधलेली धर्मशाळा पाहून कॅप्टन बर्नियर हा इंग्रज आश्चर्यचकित झाला. वाराणसी ते नाशिक पर्यंत नद्यांना
अकरा घाट बांधले. हे घाट आजपर्यंत अत्यंत उत्तम अवस्थे त आहेत. सात तीर्थक्षेत्री मोठया विहिरी खणल्या. कांची येथील ब्राम्हणांना दान केले. रामेश्वर पैठणला अन्नछत्रे उघडली. पाच ठिकाणी प्रशस्त कुंडे बांधिली.तीर्थक्षेत्रे जेजुरी येथे उत्तम तलाव बांधला. दोन ठिकाणी नंदादीप निर्माण केले. अनेक ठिकाणी वार्षिक दान चालू केले. सर्व देशभर दरवर्षी एकूण चौतीस ठिकाणी गंगाजळाच्या कावडी चालू केल्या. अहिल्याबाईनी केलेल्या सर्व कार्याचा इथे उल्लेख करता येणे शक्य नाही. पण ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टी त्यांनी ज्या परिस्थितीत पार पाडल्या ते पाहता मन थक्क होते. मान आदराने झुकते.
अशा पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंची सरकार दरबारी होणारी उपेक्षा बघून आपण विषण्ण होऊन जातो. मुंबई महाराष्ट्राची राजधानी. एक कोटी लोकसंख्येच्या ह्या अवाढव्य नगरीत अक्षरश: शेकडो चौक आहेत. त्यातल्याच चर्चगेट येथील एका चौकात मुंबई महानगरपालिकेने पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर चौक, जन्म सन 1725. स्वर्गवास 1795 अशी पाटी लावली आहे. देवी अहिल्याबाईनी आपले जे खाजगी द्रव्य 16 कोटी रुपये देश, देव आणि धर्मासाठी खर्च केले त्याची आजच्या हिशोबाने 8 हजार ते 10 हजार कोटी रुपये किंमत होते. अशा परिस्थितीत मुंबई महानगर पालिकेने एका चौकात त्यांचे नाव देऊन पन्नास रुपयांची पाटी तेथे लावावी ह्या पेक्षा दुर्दैव ते कोणत. त्यांचा फोटो सर्व चलनी नोटांवर छापला पाहिजे आणि हीच त्यांना ही श्रद्धांजली होईल.
श्री. प्रभाकर पानट

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad