Type Here to Get Search Results !

डॉ नरेंद्र दाभोलकर

दाभोलकर, (डॉ.) नरेंद्र

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी डॉ. नरेंद्र दाभोलकर सर्वात धाकटे अपत्यं.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील  न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. पूढे सांगली येथील “विलिंग्डन महाविद्यालया”तून त्यांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यावर डॉ. दाभोलकरांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला

दाभोलकर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाविश्वात सुविख्यात होते. कबड्डी व या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती देणारे पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डी या क्रीडा प्रकारात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र सरकारच्या मानाचा “शिवछत्रपती पुरस्कार” व “शिवछत्रपती युवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले होते.

डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे समाजिककार्यासाठीचे योगदान हे अमूल्य आहे. त्यांनी अंधश्रध्देच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. बाबा आढाव यांच्या “एक गाव-एक पाणवठा” या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतरच्या काळात श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या “अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती” साठी कार्य सुरू केले. त्यानंतर म्हणजे १९८९ मध्ये अ.भा.अं.नि.स पासून वेगळे होऊन दाभोलकरांनी “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती”ची स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढींचं उच्चाटन करण्याण्यासाठी व्याख्यान व सभांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकरांनी अनेक वर्षे कार्य केले होते. यासाठी ते सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांची फसवेगिरी दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रयोग व प्रात्यक्षिक दाखवून लोकांसमोर उघडकीला आणले होते.

अंधश्रध्देच्या समूळ उच्चाटन व्हावे व त्याविषयीचे आपले विचार सर्वांना माहिती व्हावे या उद्देशाने डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी या विषयाशी संबंधित अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये “अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम”, “ अंधश्रद्धा विनाशाय ”, ऐसे कैसे झाले भोंदू” , “ झपाटले ते जाणतेपण ” , “ ठरलं… डोळस व्हायचंय ” , “ तिमिरातुनी तेजाकडे ”, “ प्रश्न मनाचे ”(सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) , “ भ्रम आणि निरास ” , “ विचार तर कराल? ” , “ मती भानामती ” (सहलेखक माधव बावगे), “ विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी ”, “ श्रद्धा-अंधश्रद्ध ” अश्या वाचनीय पुस्तकांचा समावेश आहे. तसंच साने गुरुजींनी स्थापन केलेल्या “साधना” या साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६ पासून २०१३ पर्यंत संपादक होते.

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी सकळी नेहमीप्रमाणे डॉ.दाभोलकर “ मॉर्निंग वॉक” साठी बाहेर फिरायला गेले असताना, सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर, अज्ञात इसमांनी ४ गोळ्या झाडून डॉ.दाभोलकरांची हत्या केली. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोलकर जागीच कोसळले . गोळीबार केल्यावर हल्लेखोर दुचाकी वाहनावरून पळून गेले. त्याववेळी पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्देविरोधासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सरकारी तसंच संस्थांनी त्यांना गौरविले होते. यामध्ये “रोटरी क्लब चा समाजगौरव पुरस्कार”, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ला दिला गेला होता. तसंच “पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार” व भारत सरकार तर्फे दिला जाणारा “पद्मश्री किताब” डॉ. दाभोलकरांना मरणोत्तेर प्रदान करण्यात आला होता

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.