Type Here to Get Search Results !

9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''

9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''

 August kranti diwas .


>>>>【सर्व माहिती डाऊनलोड करा pdf क्लिक करा 】<<<<


इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.

दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. परंतु आज या दिवसाचे महत्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढाऱ्यांनाही राहिलेले नाही.मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''

ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.
नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.
जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.
सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.


गोंदिया जिल्ह्यातील हुताम्यांचा इतिहास


तिरोडा येथील शंकरदयाल मिश्रा यांनी आपल्या उमेदीच्या काळात स्वत:ला स्वातंत्र्यलढयात झोकून देऊन गांधीवादी मार्गाने इंग्रज सरकारविरूध्द लढा दिला. त्यांना इंग्रज सरकारने अटक करून जबलपूरच्या कारागृहात टाकले़ मोडेन पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता़ कारागृहातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट भोजनाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्यांना मरणयातना देण्यात आल्या. त्यांना नंतर रूग्णवाहिकेने तिरोडयाला आणून सोडण्यात आले़ त्यानंतर अल्पावधीतच दि़१९ एप्रिल १९४३ ला त्यांची प्राणज्योत मालवली़ ते १०० दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा ८ दिवस वाघासारखे जगले़ मात्र नवीन पिढीला त्यांच्या स्मारकातून ही प्रेरणा घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.

कुऱ्हाडीच्या जान्या-तिम्या या बंधूंच्या बलिदानाची आठवण म्हणून तिथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पण दुर्दैव म्हणजे या बंधूंनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास आज त्या परिसरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही माहीत नसावा. जान्या-तिम्या स्मारकाचे तर छतही उडाले आहे. पण त्याची ना प्रशासनाला पर्वा आहे ना लोकप्रतिनिधींना. अशा परिस्थितीत आॅगस्ट क्रांतीदिनाची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
गोंदियातील सुभाष गार्डनमध्ये भोला अनंतराम किराड यांचे स्मारक आहे. जिल्ह्यातील इतर दोन हुतात्मा स्मारकांच्या तुलनेत या स्मारकाची अवस्था चांगली आहे. पण स्मारकाच्या केवळ समोरील बाजुची देखरेख ठेवली जाते. बाकी बाजुने कमरेएवढे गवत वाढलेले आहे. आॅगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येलाही ते गवत कापण्यात आले नाही, यावरून त्या स्मारकाच्या देखभालीसाठी नगर परिषद किती गंभीर आहे याची कल्पना येते. या स्मारकात आता सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसह श्रीरामाचे दोन फोटोही लागले आहेत. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ धार्मिक सत्संग होत असल्याचे गार्डनच्या कर्मचाऱ्याने सांगितले. पण स्मारकाच्या भोवती साफसफाई करण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही.


====================================

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.