Type Here to Get Search Results !

श्रावण सोमवार पुजा कशी करावी? का वाहतात शिवामूठ महादेवाला ?

श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात विशेषतः सोमवारी जे व्रत करतात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असे म्हणतात. असे मानले जाते की हे व्रत केल्यावर आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.


कसे करावे व्रत

श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी महादेवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.

पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करावे:

'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करावे-

'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करावी.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐकावी.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा.
फलाहार घ्यावा.


श्रावण मासात कठोर व्रत-नियम पालन करणे शक्य नसल्यास काही सोप्या विधी द्वारे पुण्य कमावता येतं.

-व्रत संकल्पाची गरज नाही. तीस दिवस उपास करणार्‍यांनी संकल्प घेतला पाहिजे.

-प्रत्येक सोमवारी महादेवाचे ध्यान करून व्रत ठेवावे. संध्याकाळी व्रताचे पारायण करावे. एकाजागी बसून सात्त्विक भोजन करावे.

-‍ दिवसा फळांचे सेवन करु शकता. उपास सोडण्यापूर्वी महादेवाला दुधाने अभिषेक करणे उत्तम ठरेल.

-तामसिक आहाराचे त्याग करावे. टॉमेटो, वांगी खाणे टाळावे.

-श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपास करण्याचा महत्व आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तिळ वाहावे.

-परंतू संकल्प घेतले असल्यास पांढर्‍या तिळाने अभिषेक करावे.

अशी करावी पूजा
-नियमित पूजा करत राहावी.

-गणपती नंतर महादेवाची पूजा करावी. श्रावणातही हेच क्रम असू द्यावे- सर्वप्रथम गणपती, मग महादेव, नंतर दुर्गा देवी, यानंतर भगवान विष्णू व नंतर नवग्रह पूजन करावे.

-श्रावणात ॐ नम: शिवाय जप करावे. 3, 7 किंवा 11 माळ जपाव्या.


सोमवारची शिवामुठीची कहाणी


आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला.

पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” ” महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.”

त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?”, “आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”


पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं, आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली.

पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासर्‍यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”

पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहूम लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, ” हें असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.


जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणी सोमवारी का करतात उपवास?


श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो... काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...

सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव.... श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे.

श्रावणाची कथा 

देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad