Type Here to Get Search Results !

का करतात साजरा पोळा इतिहास माहित आहे का ?

का करतात साजरा पोळा इतिहास माहित आहे का ?



पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो.पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिक/धान्य कापणीला आलेले असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.
श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावास्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत.
नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. त्या विषयाचा उल्लेख असा...नपा

'शिवाने मार्तंड भैरवाचा अवतारा घेतला तेव्हा तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचिलीत झाले. प्रस्तुत माहात्म्य कथेतही सप्तर्षीनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी-मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले आहे. इतर काही माहात्म्यकथांत असे ही सांगितले आहे की, गुरूद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला. परंतु पुढे 'शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल`अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून चंद्राच्या विनंती वरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुरगरूपात स्वीकार केला.
या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकल्या जाते. त्यांचे पाठीवर नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/ श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.


पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते.

शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.

महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.

याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' अतित कोण ?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

हा झाला मोठा पोळा. दुसऱ्या दिवशी "लहान पोळा" भरतो. छोटे मुलं मातीचे बैल घेऊन प्रत्येक घरी जातात. आणि लहान पोळा साजरा करतात.
असा हा पोळ्याचा सण आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad