Type Here to Get Search Results !

तुळशी विवाह ,तुळशीचे लग्न मराठी माहिती , तुळशी विवाह इतिहास ,तुळशी विवाह पूजा विधी , तुळशी विवाह मंगलाष्टके !

तुळशी विवाह ,तुळशीचे लग्न मराठी माहिती , तुळशी विवाह इतिहास ,तुळशी विवाह पूजा विधी , तुळशी विवाह मंगलाष्टके !





तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय.

तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५

अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

🆕 तुळसी विवाह मंगलाष्टके pdf


🆕 तुळसी विवाह आरती मराठी pdf


🌱 तुळशी विवाहाचे महत्त्व :

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः ॥

अर्थ : ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा  तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.

🌱 कशी करावी पूजा तुळसी विवाहाची /स्वरूप : 

घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.

गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन २०१७मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरॊहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या उपराज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले.

🌱 तुळसी विवाह इतिहास /आख्यायिका :

कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.

🌱 तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा :-

देवांचे जलंधर दैत्याशी युद्ध चालू होते. त्या जलंधराची वृंदा नावाची पत्नी पतीव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून जलंधर दैत्याचा वध होत नव्हता. श्रीविष्णूने जलंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. त्याच वेळी श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’ भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात.

तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.


हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्‍ये तुळशीला महत्त्व आहे.

"तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"

अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.

🌱 तुळशी व‍िवाह कसा करावा?

* तुळशी व‍िवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी.
* मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
* चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
* यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
* यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
tulsi vivah

* गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
* मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
* यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
* नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
* नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
* शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad