Type Here to Get Search Results !

महात्मा बसवेश्वर जयंती मराठी माहिती, भाषण, सूत्रसंचालन,

महात्मा बसवेश्वर जयंती मराठी माहिती, भाषण, सूत्रसंचालन,




महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. समाजसुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे. म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी व युगपुरुष मानले जाते.

शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते.  त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते. बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता. त्या राजवटीत मंगळवेढा ही राजधानी होती. बसवेश्वर हे वेदशास्त्रात, धनुर्विद्येत व इतर कलांत पारंगत असल्याने आणि ते हुशार व चाणाक्ष असल्याने राज्याचे प्रधान झाले. त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली. रेवणसिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा  जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडीवर स्थापन केल्या. पुढे, बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली व ते धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले. तेथे त्यांचा लिंगायात धर्म बऱ्यापैकी रुजला. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वतः शिवाचाही) अवतार मानतात. बसव (सं. वृषभ  = बैल) या नावावरून ते सूचित होते.
बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध इ. धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त इ. पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेतच होती. त्या पार्श्र्वभूमीवर बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्र्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ॐ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.

बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली 'शिवानुभवमंटप' म्हणजेच 'अनुभवमंटप' ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण तेथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्र्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही; परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. तेथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. बसवेश्र्वरांनी तेथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.

बसवेश्र्वरांना पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. त्यांनी आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले. उदाहरणार्थ, त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरूष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. बसवेश्वरांनी स्त्रियांना लिंग दीक्षेचा पुरुषाप्रमाणेच अधिकार दिला. त्यामुळे स्त्रियांना धार्मीक स्वातंत्र्य बहाल झाले. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत. बाराव्या शतकात बसवेश्र्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्र्चित क्रांतिकारक होते.
त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यतच्या अनुयायांचे मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते. यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे, अशी घोषणा  करणारा ‘कायकवे  कैलास’ हा  बसवेश्र्वरांनी  मांडलेला  महान  सिद्धांत  आहे.  कोणत्याही  प्रकारचे  शारीरिक  श्रम  हे हीन दर्जाचे नाहीत, असे  सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढवली.

महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म प्रामुख्याने दलित संवेदनेवर आणि मानव जातीच्या तत्वावर आधारलेला आहे. आजही या धर्मात विविध जातींचा समावेश आहे. समता हे तत्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र आहे. बसवेश्वरांनी हा बंधुभाव धर्मात कायम ठेवला. 'आपण जे कमवतो त्यात ईश्वरांचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे.' यावर त्यांनी भर दिला होता. त्यांनी जन्माने ब्राम्हणत्व नाकारुन त्यांनी लिंगायत धर्माला नवसंजिवनी प्रदान केली. त्यांना त्यांचे जीवितकार्य पूर्ण झाले असल्याची भावना निर्माण झाल्यावर, ज्या कुंडलसंगमामुळे आपण ईश्वरी इच्छाशक्तीचे साधन बनलो त्या कुंडलसंगमाकडे गेले पाहिजे, असे त्यांना वाटले. इ.स. 1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ उभारले आहे.

महात्मा बसवेश्वर जयंती मराठी माहिती :




महात्मा बसवण्णा यांची आज जयंती!

बसवण्णांचा जन्म 1105 मधला. ते बिज्जल राजाच्या दरबारी महामंत्री होते.
त्यांनी प्रचलित धर्मातील अंधश्रध्द, कर्मकांडी आणि जन्माच्या आधारे भेदभाव करणार्या अनेक प्रथांच्या विरोधात बंड पुकारले. हे बंड पर्याय देणारे सकारात्मक बंड होते.
*प्रत्येकाने श्रम करुनच जगले पाहिजे.
*जन्माच्या आधारे भेदभाव नाही
*सर्व जातींच्या स्त्री-पुरुषांची सहभोजन परंपरा सुरु केली
*सर्व समाजातील स्त्री-पुरुषांनी सामुहिकपणे अध्यात्मिक उपासना करावी
*जगातील पहिली संसद असे ज्याचे वर्णन केले जाते ती "अनुभव मंटप" नावाची परंपरा त्यांनी सुरु केली. अनुभव मंटप असे सार्वजनिक ठिकाण जिथे सर्व समाजघटकातील स्त्री-पुरुष एकत्रित बसणार, आपापले अनुभव सांगणार आणि त्यातुन समाज म्हणून एकत्रितपणे पुढे जाण्याचे नियम ठरत.
*बसवण्णांचे एक महत्वाचे वचन आहे, "कायकवे कैलास". कैलास म्हणजे मोक्ष. म्हणजे काम केल्यानेच मोक्ष मिळतो. मोक्षासाठी उगा कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही.
*अशा समतावादी लिंगायत धर्माचे पालन करणारांना शरण आणि शरणी म्हणत. ही श्रमण परंपरा मानली जाते. आज आपण जसे एकमेकास नमस्कार म्हणतो तसे या परंपरेत एकमेकास "शरणु शरणार्थी" असे म्हणत अभिवादन करत.
*बसवण्णांनी आपल्या सहकार्यांच्या मुलगा-मुलगीच्या विवाहास समर्थन दिले जो आंतरजातीय विवाह होता. मुलगा पुर्वाश्रमीच्या चांभार समाजाचा (हरळय्या व कल्याणीचा मुलगा शीलवंत) तर मुलगी पुर्वाश्रमीच्या ब्राम्हण समाजातील (मधुवय्याची मुलगी कलावती)
बसवण्णांच्या सुधारणावादी, समतावादी कार्याने खवळलेल्या सनातन्यांनी या घटनेचे भांडवल केले, लोकांना भडकावले आणि दुसर्या बाजुला राजा बिज्जलाचा खुन करुन त्याचा आळ बसवण्णावर आणला. सहकार्यांच्या आग्रहाने बसवण्णा जीव वाचविण्यासाठी पळाले पण सनातन्यांनी अनेक शरण-शरणीं ची हत्या केली. त्यानंतर बसवण्णांनी पुन्हा समतावादी लिंगायत परंपरा वाढवायचा प्रयत्न केला.
नंतरच्या काळात या समतावादी विवेकी विचारांमधे
 परंपरावाद्यांनी पुन्हा त्यात निर्रथक कर्मकांड आणि विषमतावादी चालीरिती रुजवायचा प्रयत्न केला.
प्रो एम एम कलबुर्गी हे बसवण्णांचे मुळ विचार पुन्हा सांगत होते. या क्रांतीकारी परंपरेत जन्मजात विषमतावादी व निर्रथक कर्मकांडी परंपरांचे प्रदुषण करु नका असे सांगत होते. बसवण्णाला बसवण्णाच राहुद्या, त्यांना महात्मा बसवेश्वर करु नका असे सांगत होते. कर्नाटकात अण्णा म्हणजे मोठा भाऊ. तर कलबुर्गी मारले गेले.
बसवण्णांचे क्रांतीकारी, समतावादी आणि विवेकी विचार आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचा प्रचार करत राहणे हेच बसवण्णा यांना जयंतीदिनी अभिवादन!


- राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad