Type Here to Get Search Results !

ज्येष्ठागौरीची कहाणी ,श्रीहरितालिकेची कहाणी ,ऋषिपंचमीची कहाणी कथा।

ज्येष्ठागौरीची कहाणी ,श्रीहरितालिकेची कहाणी ,ऋषिपंचमीची कहाणी।


आटपाट नगर होते, तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनीं गौरी आणल्या. रस्तोरस्तीं बायका दृष्टीला पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरी आलीं. आईला सांगितलं, “आई, आई, आपल्या घरी गौरी आण.”

आई म्हणाली, “बाळांनो गौर आणून काय करूं? तिची पुजापत्री केली पाहिजे, घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्हीं बाबांजवळ जा, बाजारांतलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.” मुलें तिथून उठलीं, बापाकडे आलीं “बाबा, बाबा, बाजारांत जा. घावन-घाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील.” बाबानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला

सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांच हट्ट पुरवत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जावं तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं. म्हणून उठला, देवाचा धंवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीणं भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.

ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली. आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली, तो मडकं आपलं कण्यांनीं भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळींजणं आनंदानं निजलीं.

सकाळ झाली, तशी म्हातारीनं ब्राह्मणास हांक मारली, “मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग.” म्हणून म्हणाली, “घावनघाटलं देवाला कर नाहीं कांहीं म्हणूं नको. रड काही गाऊ नको.” ब्राम्हण तसाच उठला,घरात गेला. बायकोला हांक मारली, “अग अग ऐकलसं का? आजीबाईला न्हाऊं घाल” असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला.

बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धां पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. “उद्यां जेवायला खीर कर” म्हणून सांगितलं, ब्राह्मण म्हणाला, “आजी, आजी, दूध कोठून आणू?” तशी म्हातारी म्हणालीं, “तूं कांहीं काळजी करूं नको. आतां उठ, आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांकां मार, म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ.” ब्राह्मणानं तसं केलं.

गाईम्हशींना हांका मारल्या त्या वांसरांसुद्धां धांवत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं, दुसर्‍या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली,“ मुला मुला, मला आतां पोंचती कर.” ब्राह्मण म्हणूं लागला, “आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगळ प्राप्त झालं, आतां तुम्हांला पोंचत्या कशा करूं? तुम्ही गेलां म्हणजे हें सर्व नाहीसं होईल.”

म्हातारी म्हणाली. “तूं कांहीं घाबरूं नको, माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच. आज मला पोंचती कर.” ब्राह्मण म्हणाला, “हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांगा.” गौरीनं सांगितलें, “तुला येतांना वाळू देईन. ती सार्‍या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टांक, पेटींत टाक, फडताळांत टाक, गोठ्यांत टाक. असं केलं म्हणजे कधीं कमी होणार नाहीं” ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली.

गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळीं जावं, दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत संपत मिळेल.

ही सांठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाच्या दारीं, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

महालक्ष्मीची लोककथा :-


पुराणात उल्लेख आढळत नसला तरी महालक्ष्मीची लोककथा प्रसिद्ध आहे. एका राजाला दोन राण्या असतात. एक आवडती आणि दुसरी नावडती. अर्थात, आवडती राणी राजासोबत राजवाडयात राहत असते, तर नावडती गावाबाहेर राहत असते. एके दिवशी त्या राजाच्या दोन मावश्या त्याला भेटण्यासाठी येतात. अर्थात, पहिल्यांदा त्या राजवाडयात जातात. मात्र आवडती राणी त्यांना आपल्या घरात घेत नाही. त्या दोघी पुन्हा नावडत्या राणीकडे जातात. तिची गरिबी असते तरी ती त्या दोघींचंही ती छान प्रकारे आदरातिथ्य करते. त्या दोघीही तिच्यावर खूश होतात आणि तिला महालक्ष्मीचं व्रत करायला सांगतात. नावडती राणी महालक्ष्मीचं व्रत करते आणि त्यातून तिच्या घरी ऐश्वर्य येतं. तर आवडतीच्या घरी दारिद्रय येतं. पुढे राजाही त्या नावडत्या राणीकडे येतो. समृद्धी आणि सुख देणारं असं हे व्रत म्हणून महालक्ष्मीचं पूजन केलं जातं.

गौरीपूजेच्या बाबतींत पुराणामध्यें अशी एक गोष्ट सांपडते


गणपतीची आई जी गौरीमाता , पार्वती , तिची पूजाहि झालीच पाहिजे . म्हणून गणपती आल्यापासून तिसर्‍या दिवशीं गौरीहि येते . शहरामधील बहुजनसमाजामध्यें व खेडोपाडीं सर्रास ही पूजा जरूर केली जाते . गणपति हा शंकर -पार्वतीचा मुलगा . त्यामुळें तो घरीं आल्यानंतर त्याची आई गौरी हे देखील माहेरीं येणें स्वाभाविक आहे . या गौरीमातेच्या पूजेमागचा हेतु ही कीं , भरपूर धनधान्य आणि स्वास्थ याचें वरदान तिच्याकडून मिळावें .

त्याचप्रमाणें भरपूर आयुष्यहि तिच्याजवळ मागावें याहि हेतूनें भाविक मग तिची पुजा करतें .

या गौरीपूजेच्या बाबतींत पुराणामध्यें अशी एक गोष्ट सांपडते कीं , पूर्वींच्या काळीं दैत्यांनीं देवांना अतिशय त्रास दिला . त्यामुळें देवांच्या स्त्रियांना आपलें सौभाग्य कसें सुरक्षित राहील याबद्दल धास्ती वाटली . काळजी वाटली . त्या कारणानें सगळ्याजणींनीं एकत्र जमून या संकटामधून आपली मुक्तता करण्यासाठीं महालक्ष्मीस विनविण्याचें ठरविलें . आणि तसें झाल्यावर व महालक्ष्मीची त्यांनी पूजा बांधल्यावर ती त्यांना प्रसन्न झाली . तिनें हैत्यांचा संहार केला . आपल्या भक्तमंडळींना अडचणींतून मुक्त केलें . सुखाची त्यांच्यावर खैरात केली . त्यामुळें या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षीं गौरीपूजेचा हा उत्सव बायका साजरा करतात . त्या मागची प्रमुख भावना ही कीं , आपणांस अखंड सौभाग्य लाभावें .

परंतु खेडोपाडींच्या सामान्य बायका या सणामागचें कारण विचारतांना ही गोष्ट न सांगतां एवढेंच म्हणतात कीं , "या कारणानें पार्वतीला माहेरीं यायला मिळतें . पार्वती म्हणजे आपलीच पोर . माहेरवाशीण वर्षांतून एकदां येणारी . तिनें कौतुक करायचें . तिला माहेर करायचें . तिला सुखांत ठेवायची ." आणि त्या दृष्टीनेंच सर्वत्र हा सण पार पडतांना दिसतो .

सूर्या समूक माजं घर ग बाई मी लोटीतें घरदार

पायीं साकळ्या तंगभार ग बोटीं जोडवीं झिनकार

कमरीं दाबाला चारी कुलपं ग गळीं पुतबीळ्याची माळ

वर चिताक नक्षीदार ग डाळीं डोरलं पांच फेर

नथ नाकांत डौलदार ग काप कानांत गजबार

डोकीं केवडा मारी ल्ह्यार ग चोळी अंगांत हिरवीगार

नेशी पिवळा पितांबर ग हातीं सोन्याच बिलवर

मी ग निगालें न्हवयीना ग लेक बाबांची तालीवार

अशा प्रकारचे सगळे दागिने -जुन्या काळचे असे -एकत्र गुंफून तयार झालेलें गीत गात घरोघरींच्या पोरीबाळी न्हवणाला जातात . गौर आणायला म्हणून जातात . हातांत पानाफुलांनी सजवलेला तांब्या घेऊन नदीवर नाहींतर आडावर अगर विहिरीवर जावयाचें . त्यावेळीं जातांना केलेला साजशिणगार असा बोलून दाखवायचा . घोळ्यामेळ्यानें जमून ठेक्यांत पावलें टाकीत जातांना एकमेकींचा दिमाख एकमुखानें असा म्हणावयाचा . मग खरोखर घरांत तसें वैभव नांदत नसलें तरी फिकीर नाहीं . मनाचें ऐश्वर्य कायम . कल्पनेची भरारी दांडगी .

पाणवठ्यावर जाऊन ही गौर आणावयाची म्हणजे तांब्यांतील पाण्यांत पांच खडे घेऊन यावयाचे . बरोबर नेलेलें तेरड्याचें पान व फूल त्यास वहावयाचें कोंकणामध्यें गंगेवर तेरडा नेऊन ठेवतात . त्यावेळीं नारळ व कोरें सूप नेऊन तो तेरडा व सात खडे माघारी आणतात . तेरड्यावर मुखवटा बसवतात . त्यावरच सर्व साजशिणगार चढवतात . देशावर फक्त पांच खडे आणतात . ते घेऊन घरी आलेल्या मुलीच्या पायावर गरम पाणी ओतून , तिला हळदकुंकू लावून आणि ओवाळून घरांत घेतात . आणि मग ते पांच खडे एकाद्या गाडग्यांत नाहींतर पितळेच्या भांड्यांत ठेवून गौरी बसवतात . त्या संख्येनें दोन असतात . आणि त्यांची मांडणीहि मोठी अभिनव असते . म्हणजे गाडग्यावर गाडगें उतरंडीसारखें रचावयाचें आणि वरच्या तोंडाला हळदीकुंकवानें माणसाचा चेहरा काढलेल्या लहान टिंगणीचा *मुखवटा ठेवायचा . त्यावर खण घालावयाचा . कुणीं कुणीं भांड्यावर भांडें अगर डब्यावर डबे ठेवून त्यावर मातीचा अगर वाटीवर काजळीनें काढलेला मुखवटा ठेवून उंची लुगडीं नेसवतात . क्वचित् प्रसंगीं पितळेचे मुखवटेहि दिसून येतात . मात्र या सगळ्या गोष्टींसाठीं वापरण्यांत येणार्‍या गाडग्यांत अगर भांड्यांत सवाष्णीची ओटी असते . तांदूळ अगर गहूं , पानसुपारी , लेकुरवाळें हळकुंड , खोबर्‍याची वाटी वगैरे वगैरे सर्व या गौरीला लागते . त्याचप्रमाणे मुखवटा असेल त्या बेतानें नाकांत व कानांत डाग घालतात . आणि एरव्हीं सर्रास सर्व गौरींना गळ्यांतील ठळक दागिने घालण्याची प्रथा आहे . उंची लुगडें आणि दागदागिने यामुळें ही गौर नक्षत्रासरखी दिसते . तिच्या पुढें घरांतील सुंदर वस्तूंची मांडणी करून दोन्ही बांजूना दोन समया तेवत ठेवायच्या . आणि खणनारळ समोर मांडले म्हणून त्यांना हळदकुंकूं वहायचें . या वेळीं ही सगळी शोभा बघून डोळ्याचें पारणें फिटल्यासारखें वाटतें .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.