Type Here to Get Search Results !

ज्येष्ठागौरी आवाहन मराठी माहिती ,गौरी पूजन कथा, Jyeshta Gauri – Vrat Katha, Pujan in Marathi

Jyeshta Gauri – Vrat Katha, Pujan in Marathi | ज्येष्ठागौरी आवाहन मराठी माहिती ,गौरी पूजन कथा,
Jyeshta Gauri – Vrat Katha, Pujan in Marathi


गौरी शब्दाचा अर्थ

संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची,अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत.या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.

भाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात.

ज्येष्ठागौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न-भिन्न रितीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. काही गावांत या गौरी सोन्या-चांदीचे वा पितळेचे मुखवटे धारण करणाऱ्या असतात. त्या मूतीर्ंना चांगल्या साड्या नेसवून दागदागिन्यांनी नटवले जाते. तर काही ठिकाणी केवळ कागदावर गौरीचे चित्र काढून किंवा छापील कागद आणून तिचे पूजन केले जाते. कित्येक गावांत अशी प्रथा आहे की, नदीतील पाच खडे किंवा लहान दगड आणावयाचे आणि तेच पूजावयाचे. गंमत अशी की, कित्येक ठिकाणी तर मातीचे लहान लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि ते घट एकावर एक ठेवून ती उतरंड गौरी म्हणून पूजतात.

श्रावणातली व्रतं वैकल्याची धामधूम संपत असतानाच गृहिणींना वेध लागतात गौरी-गणपतीचे! आमच्या लहानपणी गौरीमाहात्म्य मोठे. अजूनही आहे. घरातले पितळेचे गोंडस मुखवटे निगुतीने बांधून ठेवलेल्या बोचक्यातून काढायचे. चिंच-रांगोळीने उजळायचे. मग चुना, कोळसा या रंगांनी डोळे सजीव व्हायचे आणि ओल्या लाल रंगाने ओठ रंगले की गौरी माहेरी यायला सज्ज व्हायच्या.

अंगणात तुळशीपासून पूजास्थापनेच्या घरातल्या जागेपर्यंत सडा रांगोळ्यांनी घर सजायचे. लक्ष्मीची रांगोळीची पावले आणि ओल्या हळदी-कुंकवांच्या हातोप्याने गौरींचा रस्ता शोभिवंत व्हायचा. तुळशीपासून डोईवर खणाने झाकलेले मुखवटे प्रत्येक रांगोळीच्या पावलांवर टेकवीत सवाष्णींनी अदबशीर घरात आणायचे. दर टप्प्यावर - ‘लक्ष्मी आली, सोन्याच्या पावली।’ हा लोकमंत्र बायकांच्या मनातून उत्साहाने उमटत राहायचा. गौरीला प्रथम चूल - भानवशीजवळ न्यायचे - एकजण म्हणे,

‘गौरी गौरी, काय पाहतेस?’

उत्तर यायचं, ‘चूल-भानवस!’ – करीत करीत मग दूधदुभते, गाई-गुरांचा गोठा, धान्याची कोठारे (डबे), घरातल्या सोन्या-रुप्याच्या (असल्यास) तिजोऱ्या, कपाटे, पेट्या...असं सगळं घर फिरून झालं की गौरी मुख्य जागी स्थानापन्न व्हायच्या.

‘‘लाडके गौराय कधी येसी
पानी पडलं नय भारलं
भादव्याला येणं
को-या सुपात येणं
झणकत येणं’’

खांद्यापर्यंत आकाराच्या एक-दीड फुटाच्या सालंकृत, साड्या नेसवलेल्या साचांवर मुखवटे चढवले की मूर्तिमंत गौरी प्रकट व्हायच्या. काही ठिकाणी नारळाला/तांब्याला कुंची घालून बाळं ठेवतात. मग पुढचे दोन-अडीच दिवस या माहेरवाशिणींच्या कौतुकात घरातल्या सासुरवाशिणी आणि खास गौरींसाठी आलेल्या माहेरवाशिणी रंगून जायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ फुले, गजरे, आरती, नैवेद्याच्या परोपरी आणि मुख्य म्हणजे गौरींची सालंकृत रूपे आणि भोवतालची सजावट यात बायकांच्या पारंपरिक कलाकौशल्यांची उधळण झालेली असायची. आज- अजूनही थोड्याफार फरकाने ज्या घरी गौरी बसतात, त्या बहुसंख्य घरांत असंच वातावरण असतं. गौरींचा उत्सव प्रामुख्याने स्त्रीप्रधान!

गौरी अनुराधा नक्षत्रावर येत असल्या, तरी तिचा दिग्विजयी पुत्र मात्र तिथीनुसार चतुथीर्च्या दिवशीच आलेला असतो. जाताना कित्येक ठिकाणी विश्वमाऊली गौरी आपल्या पुत्राला बरोबर घेऊन जाते. ज्या घरी गौरी पूजनाची प्रथा नाही तिथे मात्र गणपतीचा मुक्काम हा गौरी विसर्जनानंतही असू शकतो. दोन, चार, सहा, अकरा किंवा एकवीस दिवसही असा हौसेखातर किंवा श्रद्धेपोटी गणपती घरात ठेवला जातो. मायमाऊली गौरी नक्षत्रावर भर देते, तर पुत्र तिथीप्राधान्य मानतो. हे व्यक्तिस्वातंत्र्य आपल्याकडे पूवीर्पासूनच आहे.

ज्येष्ठागौरी कथा (Jyeshta Gauri – Vrat Katha) ज्येष्ठागौरी आख्यायिका आणि इतिहास

हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे ; म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

ज्येष्ठागौरी व्रत करण्याची पद्धत (Jyeshta Gauri Vrat Pujan)

हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. – ही एक रूढी आहे.)

गौरी आवाहन (दिवस पहिला)

आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आहे.

गौरीपूजन (दिवस दुसरा)

दुसर्‍या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
कोणत्याही प्रदेशात आणि जातीजमातीत सोळा प्रकारच्या भाज्या हव्यातच! त्यात अनेक पालेभाज्या आणि दुधी, दोडका अशा वेलभाज्या! भरपूर येतातच ना त्या पावसाळ्यात! मग गोडा नैवेद्य म्हणजे घाटावर पुरणपोळी, कोकणात घावन-घाटले, तर काही ठिकाणी चक्क तिखट (सामिष) नैवेद्य हवाच! जुन्या रीतीप्रमाणे काही समुदायात मद्यही आवश्यक! काहीच नसेल तर जमातीचा ‘पुरोहित’ (तिखट) नैवेद्यावर चार थेंब मद्य शिंपडणारच!

विदर्भातल्या गौरींचा (लक्ष्म्यांचा) नैवेद्यही व‍ऱ्हाडी अघळपघळ प्रवृत्तीसारखाच! जोंधळ्याची आंबील हवीच! बहुधा गोड. कधी तिखट–खारी. तीही सत्यनारायणाच्या प्रसादासारखी सव्वा पटीत! सव्वा पावशेर/शेर/पायली! आंबील शिजवलेलं मोठ्ठं पातेलं तसंच लक्ष्म्यांपुढे! मग पुरणपोळी, १६ भाज्या वगैरे आहेच! जेवायला खूप लोकांना बोलवायचं. आंबिलीचे पावित्र्य मोठे. इथे तिथे हात धुवायचा नाही- अंगणात एका खास खड्ड्यातच हात धुवायचे! ‘समुद्र’ म्हणतात त्याला. नंतर तो खड्डा बुजवायचा! हळदी-कुंकवाला येणारी प्रत्येकजण लक्ष्मीची खणा-नारळांची ओटी आणि ऐपतीनुसार धान्य घेऊन येणार! पुन्हा गृहिणीने ती सगळी ‘रास’ घटस्थापनेपूर्वी घरातच पै-पाहुण्यांसाठी पदार्थ खाऊ घालूनच संपवायची. उचलून घराबाहेर काही न्यायचं नाही.

अनेक ठिकाणी नैवेद्याच्या वेळी कणकेचे १६, क‌ुठे ३२ दिवे आणि मुठे करून केळीच्या पानाभोवती ठेवायचे! नैवेद्य केळीच्या पानावरच वाढायचा. वाढून झालं की वऱ्हाडात त्या खोलीचं दार काही काळ बंद ठेवतात. आत लक्ष्म्या जेवतात ना! दार उघडलं की बारकाईनं पान बघायचं. कोणकोणते पदार्थ उष्टावले गेलेत? सगळी गंभीर गंमत!

एक संकेत मात्र सगळीकडे! गौरी, लक्ष्मी घरात असेपर्यंत घरातला पैसा बाहेर द्यायचा नाही.

विसर्जन (दिवस तिसरा)

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.

दोरकाची पूजा 

या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.

महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर गौरी पूजन

मराठवाडयात मात्र काहीशी वेगळी पद्धत पाहावयास मिळते. ‘गौरी’ असा उल्लेख न करता तिला ‘महालक्ष्मी’ असं संबोधलं जातं आणि महालक्ष्मीच्या रूपातच तिची पूजा केली जाते. मराठवाडयात नव्यानं लग्न झालेली मुलगी या दिवशी आवर्जून माहेरी येते. मुलीच्या लग्नानंतर पहिल्या महालक्ष्मी सणाच्या वेळी तिचे आई-वडील ‘महालक्ष्म्या’ घेऊन मुलीच्या घरी (सासरी) जातात. नव्या सुपात ठेवून या महालक्ष्म्या सासरच्या घरी सन्मानानं दिल्या जातात. सासरची मंडळीही आपल्या घरी ‘लक्ष्मी’ आली या भावनेनं देवीच्या या प्रतिमांचा स्वीकार करतात आणि सुनेलाही महालक्ष्मीच्या रूप मानतात.

पूर्वी वर्षभर सुनेला सासूरवास सहन करावा लागत असला तरी या तीन दिवसांच्या काळात मात्र तिला अत्यंत सन्मानानं वागवलं जायचं. आता सासूरवासाचं प्रमाण कमी झालं असलं तरी या तीन दिवसांत सुनेचा सन्मान मात्र कायम आहे. दिवाळीत जेवढे फराळाचे पदार्थ केले जातात तितकेच पदार्थ या सणाच्या निमित्तानं केले जातात. मराठवाडयात आणि विदर्भातील उत्सवात बरंच साम्य असल्याचं दिसून येतं. विदर्भात ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असाही एक प्रकार आहे. ज्येष्ठा गौरी श्रीरावणातच येतात. तर कनिष्ठा गौरी भाद्रपद महिन्यात येतात. दोन्हीकडे लक्ष्म्यांच्या पुढे वेगवेगळया प्रकारचे खेळ, त्या लक्ष्मीच्या मुली, असा परिवार असतो. त्याशिवाय वेगवेगळया धान्याच्या राशी महालक्ष्मीपुढे ठेवल्या जातात. एकंदरच हा उत्सव शेतीशी निगडित असल्याचं दिसतं.

भारतात भाद्रपदातली ज्येष्ठा गौर महाराष्ट्रातही विविध प्रकारे अवतरते. सालंकृत मूर्तिरूपात अनेक ठिकाणी ती जोडीने येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा! बायकांच्या भाषेत सोवळ्यातली आणि ओवळ्यातली. या मूर्तिरूपांना बहुधा महालक्ष्मी, लक्ष्म्या म्हणतात. कोकणात अनेक ठिकाणी एकच मूर्ती असते. कोकण-गोवा प्रदेशात मुखवट्याची एकच गौरीची मूर्ती असते. पण त्याच जोडीला पाणवठ्याकाठी आपोआप उगवलेली रंगीबेरंगी फुलांची तेरड्याची रोपे आणून तीच गौर म्हणून पुजतात. आम्ही लहानपणी या फुलांना गौरीची फुलं म्हणत असू ते का? याचा उलगडा तेरड्याच्या रोपांची गौर पाहिली तेव्हा झाला. बाकी सगळे सोपस्कार मूर्तिरूप गौरींसारखेच! नैवेद्य, जागरण सगळेच!

कोकणस्थ ब्राह्मणात व कर्नाटकात अनेक ठिकाणी पाणवठ्यावरून किंवा तुळशीच्या रोपाजवळचे दोन खडे कलशात घालून मिरवत आणून तेच गौर म्हणून पूजतात. काही ठिकाणी तिला ‘गंगा गौर’ म्हणतात. खरेतर ही खड्यांची किंवा तेरड्याच्या रोपांचीच मूळ गौर असावी. माणसाच्या भौतिक विकासाबरोबर तिला सालंकृत मूर्तिरूप आले असावे. रूप कसेही असले तरी तिच्या उपासनेचा उल्हास सगळीकडे सारखाच!


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.