Type Here to Get Search Results !

दिवाळी - धनत्रयोदशी/धनतेरस दिवाळी दुसरा दिवस

दिवाळी - धनत्रयोदशी/धनतेरस दिवाळी पहिला दिवस :


हिंदू धर्मातील प्रमुख सणांपेकी एक असलेल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनत्रयोदशीने आज दिवाळीपर्वाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी धार्मिक परंपरेनुसार घरोघरी पूजेची तयारी करण्यात आली आहे. 
   अश्‍विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजाअर्चा करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी योग्य मुहूर्त असल्याचे मानले जाते.
दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात. 

हे पण वाचा 🔜 









कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना पायसाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी शक्य असले तितकं दान करण्यात येतं. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित करून त्याचं पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते, असा समज आहे.


धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा : 


कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.


धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे? 


 भगवान धनवंतरीची पूजा करा. 
घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा. 
सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी. 
मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा. 
 तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा. 
कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.


यमदीपदान :


प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) (टीप २) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा.किंवा धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. 
 गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.
 एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.

आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते. 


यमराज पूजन : 


 या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा. 
 घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.


धन्वंतरी पूजन /जयंती :


धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.


धन्वंतरि जन्म :


‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.’

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.


गोत्रिरात्र व्रत : 


गोत्रिरात्र व्रतही आश्विन वद्य त्रयोदशीपासून अमावस्येपर्यंत केलं जातं. यामुळे गाईचा गोठा किंवा येण्या-जाण्याचा मार्ग यापैकी सोयीस्कर ठिकाणी ८ फूट लांब व ४ फूट रूंद यज्ञवेदी तयार करून त्यावर सवोर्तोभद मंडल स्थापन केलं जातं. त्यावर छत्राकार वृक्ष काढून त्याला फळं, फुलं, पक्षी काढले जातात. झाडाच्या बुंध्याशी मंडलाच्या मध्यभागी गोवर्धनधारी श्रीकृष्ण, डाव्या बाजूला रुक्मिणी, मित्रविंदा, शैब्या, जांबवंती व उजव्या बाजूला सत्यभामा, लक्ष्मणा, सुदेष्णा, नाग्नजिती, पुढील भागात नंदबाबा मागील भागात बलराम तसंच कृष्णासमोरच्या भागात सुरभी, सुनंदा, सुभदा, कामधेनू यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापित केल्या जातात. ‘गोर्वधनाय नमः’ म्हणत प्रत्येकाची पूजा केली जाते. त्यानंतर गाईंना नैवेद्य दाखवला जातो. पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून टोपल्यातून सात धान्यं, सात पक्वान्नं सुवासिनींना दिली जातात. अशा प्रकारे व्रत करून चौथ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर १०८ तिळांची आहूती दिली जाऊन व्रताचे उद्यापन केले जाते. यामुळे सुखप्राप्ती होते, असे मानले जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad